85305 84532 | 98210 87115
info@saveoursahyadri.net

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेला व निसर्गसमृद्धीचे वरदान लाभलेला आपला सह्याद्री . ह्या सह्याद्रीची वनसंपत्ती व जैवविविधता आज धोक्यात आहे . प्रदूषण, मानव - निर्मित आगी या मुळे ही निसर्ग संपदा लोप पावत चालली आहे. हे थांबवूया ! या निसर्गाच्या वारशाचे जतन करून, त्या आधारे शाश्वत रोजगार निर्मिती करू .

ह्यासाठी आम्ही हाती घेत आहोत ही महत्वाकांक्षी मोहीम -

' Mission Sahyadri '

जाणूया आपल्या सह्याद्रीबद्दल
  • आज आपल्याला परिचित असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांचे वय अंदाजे ६.५ कोटी वर्षे मानलं जातं. सह्याद्री अनेक राज्यांमधून पसरला असला तरी महाराष्ट्रात त्याच स्थान महत्वपूर्ण आहे.

  • ज्वालामुखीच्या उद्रेकाद्वारे आणि लाव्हा रसाचे थरावर थर चढून सह्याद्रीची पर्वत रांग आणि पुढे दख्खनचे पठार तयार झाले. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आढळणारा दगड म्हणजे निवलेल्या लाव्हा रसापासून बनलेला बेसाल्ट - किंवा काळा पाषाण. पठारावर याच बेसाल्ट खडकांची लक्षावधी वर्ष झीज होऊन तयार झाली सुपीक काळी माती (ब्लॅक कॉटन).

  • सह्याद्रीचा घाटमाथा आणि पश्चिम उतारावर पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे खडकांची झीज निराळ्या प्रकारे झाली, त्यातील विद्राव्य घटक वाहून गेले आणि त्याचे लाल जांभा खडकात रुपांतर झाले. या जांभ्याची झीज होऊन तयार झालेली लाल माती सह्याद्रीच्या उतारांवर आणि दक्षिण कोकणात सर्वत्र आढळते.

  • सह्याद्री पर्वतरांगांचे अंदाजे क्षेत्रफळ १६४,००० चौ.कि.मी. आहे. उत्तरेकडे गुजरात सीमेपासून सुरु होऊन दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत समुद्र किनाऱ्याला समांतर जवळजवळ १५०० कि.मी. लांब अखंड भिंतच आहे.

  • ९२०० पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजाती, शेकडो प्रकारचे प्राणी, मासे व कीटक आणि जगातल्या आठ सर्वात जास्त जैवविविधता असलेल्या यादीत सह्याद्रीचा समावेश आहे. हीच निसर्गसंपदा सह्याद्रीचे वैभव आहे.

  • या जैवविविधतेचे संरक्षण करून पर्यावरणाचे संतुलन राखणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे.

शहरातील श्रीमंतीचे मृगजळ

शहरात जाऊन, जे हवं ते साध्य केलं का? आपली व आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली का? थोडं थांबून विचार करूया.

मिशन सह्याद्री

संवर्धनातून समृद्धी. सह्याद्रीतील वास्तव सांगणारी डॉक्युमेंट्री फिल्म.

त्रिसूत्री मधून समृद्धीकडे वाटचाल

टसर रेशीम येती घरा तोच दिवाळी दसरा

टसर रेशीम हे आदिवासी व शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरले आहे. आज अनेक कुटुंबे या टसर रेशीम उद्योगावर उदरनिर्वाह करत आहेत.

शेतकऱ्यांचे भात, नाचणी इत्यादी नेहमीची पिके घेऊन झाल्यावर, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात करता येणारा हा उद्योग. शेतीबरोबरच हे रेशीम बनवण्याचा जोड-धंदा हा कुटुंबाला अधिक उत्पन्न तर देतोच, शिवाय त्या कुटुंबासाठी एक कौशल्य देखील विकसित करतो.

हे कौशल्य याच पिढी पर्यंत मर्यादित न राहता, पुढच्या पिढीला देखील एक कायमस्वरूपी कामाचे साधन बनेल, अशी शेतकऱ्यांची आशा आहे.

कळसुबाई मिलेट - संघटनाची ताकद

संघटनांचे उत्तम प्रारूप म्हणजे कळसुबाई मिलेट. महराष्ट्रातील ४ निरनिराळ्या तालुक्यातील - पुरंदर, त्र्यंबकेश्वर, साक्री व अकोले - शेतकऱ्यांना बरोबर घेऊन या कंपनीचे काम चालू आहे. ३०० हुन अधिक शेतकरी कळसुबाई मिलेट बरोबर जोडले गेलेले आहेत.

सह्याद्रीत पिकणारे आपले देशी बियाणे नाशिक च्या केंद्रात आणले जातात. तिथे त्यावर प्रक्रिया व पॅकिंग करण्यात येते. आज कळसुबाई मिलेटचे ८० हुन अधिक प्रॉडक्ट्स आहेत.

यातून असंख्य आदिवासी शेतकऱ्यांना एक शाश्वत रोजगार, तसेच आत्मविश्वास प्राप्त करून दिला आहे.

सोलर ड्रायर - एक वेगळा विचार

आपल्या भागात सर्वसाधारण पणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा सूर्यप्रकाश, सहज उपलब्ध असणारे तंत्रज्ञान आणि थोडासा कल्पकतेने केलेला विचार - यातून उभा राहिला आहे हा सोलर ड्रायर चा प्रकल्प.

हा जोड-उद्योग एक-दोन नाही, तर तब्बल ५० शेतकऱ्यांबरोबर, निरनिराळ्या ठिकाणी चालू आहे. कांदा, कांदा-पात, द्राक्ष, पालेभाज्या, टोमॅटो, स्ट्राबेरी अशा अनेक उत्पादनांना डिहायड्रेट करून, व्यवस्थित पॅकिंग करून विकण्यात येते.

शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देणारा, व आपल्या मालाचे मूल्य निश्चित करण्याची संधी प्राप्त करून देणारा असा हा प्रकल्प आहे.

जंगली मध

शेतीला जोड-धंद्याचा हा आणखी एक पर्याय. मधमाश्यांपासून मिळणारा मध हा आर्थिक दृष्ट्या अत्यंत फायद्याचा आहे.

पारंपरिक पद्धतीने आदिवासी बांधव मध गोळा करतात, तो आग लावून, धूर करून. याने मधमाश्याचं नुकसान होतं, व त्यांची संख्या रोडावू शकते. या ऐवजी, शास्त्रशुद्ध पद्धतीचं शिक्षण जर त्यांना मिळालं तर त्यांना जास्त प्रमाणात मध मिळेल, शिवाय मधमाश्यांची पैदास ही जास्त प्रमाणात होत राहील.

असा एकत्र येऊन, पर्यावरणाला पूरक होईल अशा रीतीने केलेला व्यवसाय आपल्याला पुढील अनेक पिढयांना सक्षम बनवेल.

सह्याद्रीचा औषधी बटवा

सह्याद्रीच्या अनेक भागात, औषधी वनस्पतींचा जणू खजिनाच आहे. भीमाशंकर च्या जंगली पट्ट्यात, विविध तालुक्यांमधून राबवलेला असाच एक उपक्रम म्हणजे कुसुमानंद फार्मर-प्रोड्युसर कंपनी.

महिला बचत गटांद्वारे, शेतकरी महिला येथील औषधी वनस्पतींचा कच्चा माल गोळा करतात. मशीन वापरून त्यावर प्रक्रिया केली जाते. अशा निवडक, स्वच्छ करून प्रक्रिया केलेल्या मालाला, केवळ कच्च्या मालापेक्षा ३ पट किंमत मिळू शकते.

मात्र असे व्यवसाय चालायचे असतील, आणि हा आपला पारंपरिक औषधी ठेवा जपायचा असेल तर जंगल संवर्धन करण्याला पर्याय नाही.

बांबू - सह्याद्रीचे वरदान

कोल्हापूर, सांगली च्या भागात गेल्या १०० वर्षांपासून ऊस शेतीला प्राधान्य आहे. मात्र सर्व जण या शेती मागे लागल्याने, जमिनीचा कमी झालेला कस, अनियमित मागणी, कारखानदारांची अरेरावी अशा अनेक समस्यांनी ऊस शेती अडचणीची बनली आहे.

बांबू, हा ऊस शेतीला अतिशय सुयोग्य असा पर्याय म्हणून समोर आला आहे. एकदा लागवड केली, की दर वर्षी फारशी मशागत, खतपाणी न करता, बांबू आपल्याला वर्षानुवर्षे उत्पन्न देत राहतो. बांबूच्या काठ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. फळझाडांना आधार देण्यासाठी, बांबूच्या काठ्या वापरल्या जातात. या काठ्यांच्या लांबीनुसार याची विक्री करण्यात येते.

बांबू हा पर्यावरणाला ही फायदेशीर ठरतो. अनेक भेटवस्तू, शोभिवंत वस्तूंसाठी बांबू प्लास्टिक ला पर्याय ठरत आहे.

सहभागी व्हा

" Mission Sahyadri " ही एक मोहीम आहे, आणि हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. जेंव्हा शेतकरी, सुजाण नागरिक, सहकारी संस्था, खासगी कंपन्या, व सरकारी यंत्रणा एकत्र कामाला लागेल, तेव्हाच या मोहिमेला यश येईल. आपल्याला या साठी प्रचंड मनुष्यबळ, कौशल्य, नव-नवीन कल्पना, तसेच पैश्याची गरज भासणार आहे. आम्हाला समाजातील सर्व घटकांचा सहभाग यात अपेक्षित आहे.

तुम्हाला जर या उपक्रमात कोणत्याही प्रकारे सहभागी व्हायचं असेल, तर आमच्या टीम शी संपर्क करा.

चित्रकथा

सहकारी संस्था