शेतकऱ्याची दुरावस्था

शेतकऱ्याची अवस्था
सह्याद्रीतील शेतकऱ्याचे वर्तमान अतिशय भीषण आहे. तो अनेक अडचणींच्या चक्रव्यूहात अडकला आहे.

पिढी गणिक जमिनीचे तुकडे होऊन, वैयक्तिक जमीन धारणा कमी झाली आहे.

संपूर्ण शेती ही पावसावर अवलंबून आहे. पावसाळी शेती झाली की केवळ मोल मजुरी हाच पर्याय त्यांना उरतो.

तुकड्यांची कोरडवाहू जमीन. त्यातून नियमित कमाई नसल्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत. शहरात चांगली कमाई होईल, नियमित पगार मिळेल या आशेने तरूण शहरात जातात आणि त्यांच्यासाठी वेटर, वॉचमन, बिगारी कामगार अशी कामं करणे हाच पर्याय असतो.

तरूण मूलं शहरात गेल्यावर शेती करायला गावात शिल्लक राहतात वयस्कर माणसं. शेतीची कामं करायला पुरेसं मनुष्यबळ नसल्यामुळे त्यांना शेवटी दूध विकणे, शेळ्या-कोंबड्या पाळणे असे करून उदरनिर्वाह करावा लागतो
सह्याद्री मधील निसर्ग संपदेचे वास्तव
सह्याद्रीतील वृक्षसंपदेचा दिवसेंदिवस ऱ्हास होत चालला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. उतारांवरून पावसाचे पाणी वेगाने वाहून जाते. त्यामुळे डोंगर उतारावरील मातीची धूप होते. ही वाहून आलेली माती धरणांमध्ये साठते, परिणामी नद्यांना पूर येणे, नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरून वाताहात होणे, दरड कोसळणे या गोष्टी साहजिकच होतात.
कालांतराने, पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. जागतिक हवामान बदल व स्थानिक पर्यावरणाचा नाश यामुळे हजारो वर्षांपासूनचे शेतीचे अनुभवसिद्ध गणित कोलमडले आहे.
वन्य जीवांचा आसरा नष्ट होऊन ते शेतांवर हल्ला करतात. हिंस्र जंगली प्राण्यांचा वाढता वावर मानवी वस्त्यां मध्ये आढळून येतो.
सह्याद्री व त्यातील वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्थेला वाचवायचं असेल तर डोंगरांवरील जंगलांचा विध्वंस आणि अतिरिक्त मानवी हस्तक्षेप थांबवावा लागेल.