
संघटन
आपल्याला जर आपल्या भविष्याला वाचवायचे असेल, तर शाश्वत विकासाचा मार्ग निवडावा लागेल. यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे संघटन.
गावकऱ्यांनी एकत्र येऊन सुरु केलेले शेतकरी गट, महिला बचत गट या माध्यमांतून हे साध्य करता येईल.
गट किंवा शेतकरी-उत्पादक (Farmer-producer) कंपनी सुरु केल्याने शेतकऱ्यांचा चांगला फायदा होऊन त्यांना आर्थिक स्थिरता मिळू शकते.

जैविक खतं, बियाणं अश्या निविष्ठांची घाऊक भावात खरेदी करता येते.

मशीनरी व तंत्रज्ञान एकत्रित पणे उपलब्ध होते.

उगवलेला शेतमाल घाऊक प्रमाणात व किमतीत न विकता, किरकोळ किमतीत विकता येऊ शकतो.

कच्च्या शेतमालावर प्रक्रिया करून त्याला जास्त बाजारभाव मिळू शकतो.
अशी कंपनी सुरु करण्यासाठी कोणतेही किचकट कागदपत्र किंवा प्रक्रिया लागत नाही.
या प्रयत्नांना बळ देण्यासाठी, कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा - Agriculture Technology Management Agency (ATMA) ही आपल्याला मदत करते. या शिवाय सध्या सर्वात उपयोगी योजना म्हणजे प्रधान मंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME Scheme), ज्यात आपल्याला आर्थिक साह्य मिळू शकते. याशिवाय शासनाच्या सर्व योजनांमध्ये शेतकरी-उत्पादक कंपन्यांना आणि गटांना प्राधान्य दिले जाते.
यातूनच शेतकऱ्यांना स्थिरता आणि तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी मिळू शकतात.